अहमनगर : महिलांना शनिशिंगणापूर चौथऱ्यावर जाऊ देणार नाही, अशी भूमिका नवनिर्वाचित शनैश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनिता शेटे यांनी घेतलेय. त्यामुळे महिला अध्यक्षपदी येऊनही तीच मानसिकता असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी शनिमंदिरातील चौथऱ्यावर एक महिला चढल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. देवस्थानने या घटनेची गंभीर दखल घेऊन दोन कर्मचाऱ्यांना निलंबितही केले होते. या घटनेनंतर राज्यातील विविध महिला संघटनांनी निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर काल महिलेची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
शनिमंदिरातील रुढी-परंपरा यापुढेही जपल्या जातील. येथे महिला-पुरुषांना चौथऱ्याखालूनच दर्शन घेण्याचा नियम आहे. त्यामुळे महिलांना कोणत्याही परिस्थितीत चौथऱ्यावरून दर्शन खुले केले जाणार नाही, असे अनिता शेटे यांनी सोमवारी सांगितले.
शनैश्वर देवस्थान ट्रस्टची निवडणूक झाली आणि दोन महिलाही प्रथमच निवडून आल्या. त्यापैकी ५२ वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच महिलेची निवड करण्यात आली. अनिता चंद्रहास शेटे यांना हा मान मिळाला. ज्येष्ठ विश्वस्त नानासाहेब बानकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.