पुणे : बारामतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात ऊस उत्पादक शेतक-यांचा प्रश्न येणं अपेक्षितच होतं. साखर निर्यातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तर मोदींनी ठिबक सिंचनावर भर देत कृषीक्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची गरज बोलून दाखवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा ठरल्यापासूनच गाजत होता. राजकारणात नव्या संकेतांची नादी, म्हणून याकडे बघितलं जात होतं. बारामतीमध्ये झालेल्या जाहीर भाषणात शरद पवार आणि पंतप्रधानांनी यावर भाष्य केलं नसतं तरच नवल. ४ वर्षांपूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री मोदींनी केंद्रीय मंत्री या नात्यानं आपल्याला गुजरातमध्ये बोलावलं होतं, याची आठवण पवारांनी करून दिली.
राज्यातल्या दुष्काळ निवारणाला केंद्राकडून मदत मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मोदींनीही पवारांच्या अनुभावाचा आपल्याला फायदा होतो. महिन्यातून ३ ते ४ वेळा त्यांच्याशी चर्चा होते असं स्पष्ट केलं. पक्षीय राजकारणापासून वेगळं राहून समन्वय साधला पाहिजे असं सांगत आपल्या बारामती दौ-यावरून आलेल्या बातम्यांवरही त्यांनी खोचक भाष्य केलं.
मोदींनी पवारांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. बारामतीमध्ये मती आणि गती दोन्ही असल्याने बारामतीचा विकास झाला आहे. पवारांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. अॅग्रो टेक्नॉलॉजीवर भर देणे आवश्यक असून, कृषीक्षेत्राला आधुनिकतेकडे नेण्याची गरज आहे. शेतीला नुसतं पाणी देऊन उपयोग नाही, ठिंबक सिंचनसारख्या पद्धतीचा वापर करुन पाण्याची नासाडी टाळली पाहिजे, या पद्धतींमुळे शेतीलाही फायदा होईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.