देवगड: संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांनी त्रस्त असताना, हे लोण आता कोकणातही पोहोचलंय. हापूसची परदेशवारी जिथून होते त्याच देवगड मध्ये कर्जबाजारी आंबा उत्पादक शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केलीय.
आंब्याची जी बाग प्रेमानं फुलवली... तिची फळंही चाखली... त्याच पोटच्या पोराप्रमाणं जपलेल्या बागेतल्या झाडावर पांडुरंग कोल्हे नावाच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. एखाद्या शेतकऱ्यानं आत्महत्या करण्याची कोकणातली ही पहिलीच घटना. त्यामुळं अवघा कोकण हळहळलाय. पावसाच्या लहरीपणामुळे यंदा तीन-चार वेळा हापूसचा मोहोर गळून पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. आंब्याची वाहतूक करण्यासाठी घेतलेल्या टेम्पोचे हप्ते भरणं पैशांअभावी अवघड झाल्यानं पांडुरंग कोल्हे यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे कोकणातलं राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात युती सरकार अपयशी ठरत असल्याची टीका आमदार नितेश राणेंनी केलीय. तर कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी काय करता येईल यादृष्टीनं सरकारचा विचार सुरू असल्याची प्रतिक्रिया विनोद तावडेंनी दिलीय.
विदर्भ, मराठवाड्यासारखं आत्महत्येचं लोण कोकणात पसरू नये यासाठी सरकारनं बळीराजाला मदतीचा हात देण्याची गरज आहे. आतापर्यंत कोकणी शेतकऱ्यांवर एवढी संकटं आली, मात्र त्यांनी कधीच असं टोकाचं पाऊल उचललं नव्हतं. त्यामुळं पांडुरंग कोल्हेंची ही आत्महत्या शेवटचीच आत्महत्या ठरावी, एवढीच अपेक्षा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.