केडीएमसीच्या आयुक्तांना जाग, अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात

गेले काही महिने शांत असलेले केडीएमसी आयुक्त ई. रविंद्रन आता आक्रमक झालेत. कल्याण ते शीळफाटा या रस्त्यावरची अनधिकृत बांधकामं त्यांनी जमीनदोस्त केलीत. नवी मुंबईचे तुकाराम मुंढे आणि ठाण्याचे संजीव जयस्वाल यांच्या धडाकेबाज कारवाईनंतर रविंद्रन यांनाही आता जाग आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झालीय.

Updated: Dec 8, 2016, 10:09 AM IST
केडीएमसीच्या आयुक्तांना जाग, अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात title=

विशाल वैद्य, कल्याण : गेले काही महिने शांत असलेले केडीएमसी आयुक्त ई. रविंद्रन आता आक्रमक झालेत. कल्याण ते शीळफाटा या रस्त्यावरची अनधिकृत बांधकामं त्यांनी जमीनदोस्त केलीत. नवी मुंबईचे तुकाराम मुंढे आणि ठाण्याचे संजीव जयस्वाल यांच्या धडाकेबाज कारवाईनंतर रविंद्रन यांनाही आता जाग आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झालीय.

५ डिसेंबरला ठाणे मनपाचा बुलडोझर कळव्यापासून शिळफाट्यापर्यंत विविध फिरला. शिळफाट्यापासून जवळच असलेल्या खिडकाळीपर्यंतची बांधकामं, अनधिकृत बार, गॅरेजे, हुक्का पार्लर मनपाने जमीनदोस्त केले. 

कल्याण शीळ रस्त्यावरचा पलावाच्या पुढचा भाग हा कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत येतो. ठाणे मनपाने दाखवलेली हिंमत कल्याण डोंबिवली महापालिका दाखवणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत होते. त्याला उत्तर देत मनपाने बुधवारी सकाळपासून थेट कारवाईलाच सुरूवात केली.

मोठा पोलीस फौजफाटा, शेकडो कर्मचारी, अधिकारी आणि मशिनरी घेऊन डोंबिवलीच्या टाटा पॉवरपासून पाडकामाला सुरूवात झाली. यावेळी स्थानिक जनता आणि २७ गाव संघर्ष समितीने जोरदार विरोध केला. कुठलीही पूर्वसूचना न देता बांधकामं पाडल्याने अन्याय झाल्याची तक्रार स्थानिकांनी केली तर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते वंडार पाटील यांनी केडीएमसी २७ गावांवर दादागिरी करत असल्याची तक्रार केली.

संघर्ष समितीच्या नेत्यांनी तात्काळ आयुक्त ई रविंद्र यांची भेट घेत त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही दबावाला न झुकता ही कारवाई सुरूच राहील याची ग्वाही आयुक्तांनी दिलीय.

स्थानिकांच्या दबावामुळे सुरूवातीला काहीकाळ थांबलेलं हे पाडकाम पुन्हा जोमात सुरू झालं. मात्र इतके दिवस थंड असलेले आयुक्त अचानक आक्रमक कसे झाले? असा प्रश्न स्थानिक पातळीवर विचारला जात होता. ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि नवी मुंबईचे तुकाराम मुंढे यांच्याकडून प्रेरणा घेतली की मुख्यमंत्र्यांनी रविंद्रन यांना कठोर होण्याबाबत अल्टीमेटम दिला? हे प्रश्न विचारले जात होते. मात्र, कारण काहीही असो आयुक्तांच्या कारवाईमुळे किमान कल्याण शीळ रस्त्याची नेहमीच्या वाहतूक कोंडीतून मात्र सुटका होईल.