मुकुल कुलकर्णी, नाशिक : भागवत धर्माची पताका फडकविणारे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने आज पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. ग्यानबा तुकारामाचा जयघोष करीत शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून १४ जुलैला ही पालखी पंढरीत दाखल होणार आहे.
आषाढी वारीसाठी शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार ज्ञानोबा माऊलींचे गुरु आणि ज्येष्ठ बंधू असणाऱ्या निवृत्ती नाथ महाराजांची पालखी त्रंबकनगरीतून पुढच्या दिशेने मार्गस्थ झाली. मजल दरमजल करत ही पालखी २५ दिवसांचा प्रवास करून १४ जुलैला पालखी पंढरी दाखल होणार आहे. २३० किलोच्या चांदीचा रथ यंदाच्या पालखीचं मुख्य आकर्षण आहे. पालखीचे ठिकठिकाणी रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं.
यंदाच्या वर्षी पालखीत वारकऱ्यांची संख्या जास्त पहायला मिळतेय. त्रंबकनगरीतून जसे पालखीने प्रस्थान ठेवले तसा पावसाचा शिडकाव झाल्याने हा शुभ संकेत मानून वारकरी संप्रदाय पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालंय.
विठूरायाच्या दर्शनाच्या आशेन पायी पायी निघालेल्या ह्या दिंड्यांच शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या 'सपकाळ नॉलेज हब'मध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. सपकाळ नॉलेज हबचे सर्वेसर्वा रविंद सपकाळ यांनी स्वतः पालखीप्रमुखांचे स्वागत करून पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्यात. नाशिक त्रंबकरोडच्या कडेला मंडप टाकून वारकरी मंडळीसाठी फराळाची पाण्याची सोय देखील करण्यात आली होती.
पालखीचा पहिला मुक्काम नाशिक शहराला लागून असणाऱ्या सातपूर गावात आहे. सकाळी पुन्हा पालखी आपल्या पुढच्या प्रवासासठी मार्गस्थ होणार आहे. नाशिक महागरपालिका आणि नाशिककरांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावासमोर महापौरांच्या हस्ते पालखीचे स्वागत केलं जाणार आहे.