काँग्रेसला पडलाय आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी

स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडला असून इतक्या वर्षांत त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकही काम केलं नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पालघरमधील सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर कडाडून टीका करत आपल्या आत्तापर्यंतच्या कामाचा जनतेला लेखाजोगाही दिला. 

Updated: Oct 13, 2014, 01:37 PM IST
काँग्रेसला पडलाय आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी title=

पालघर: स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडला असून इतक्या वर्षांत त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकही काम केलं नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पालघरमधील सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर कडाडून टीका करत आपल्या आत्तापर्यंतच्या कामाचा जनतेला लेखाजोगाही दिला. 

स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात काँग्रेसचं सरकार आहे, मात्र त्यांनी कधीच आदिवासी समाजाच्या हिताचा, कल्याणाचा विचार केला नाही. इतक्या वर्षांत त्यांना आदिवासींसाठी एक मंत्रालय बनवता आलं नाही, काँग्रेसला आदिवासींचा विसर पडला आहे, अशी टीका त्यांनी केली. वाजपेयींच्या काळात आदिवासींसाठी वेगळं मंत्रालय झालं, आदिवासींना मंत्री बनवण्यात आलं. आमच्या सरकारनं या बजेटमध्येही आदिवासींसाठी अनेक योजना आणल्या आहेत, असं ते म्हणाले. 

महाराष्ट्र आणि गुजरातमधील मच्छिमार एकमेकांच्या सुखदु:खातील साथीदार असल्याचा उल्लेखही त्यांनी या सभेत केला. अनेक मच्छिमार शेजारील देशातील तुरुंगात कैद असल्याचं सांगत मच्छिमारांच्या हिताबद्दल विचार करणं हे माझं काम असल्याचं ते म्हणाले. तसंच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर सर्वात पहिल्यांदा मी पाकिस्तानचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांच्याशी याच मुद्यावर चर्चा केली, असं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानमधील २०० मच्छिमारांची सुटका झाली, इराकमध्ये अडकलेल्या नर्सेसचीही सुटका झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. 

नुकत्याच निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याबद्दल बोलताना त्यांनी ज्याप्रमाणं नवजात बाळाची पालक, नातेवाईक काळजी घेतात, त्याचप्रमाणं नवीन जिल्ह्याची काळजी घेणं हे सरकारचं काम असतं. त्यामुळं केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाला पूर्ण बहुमत द्या आणि तुमच्या जिल्ह्याच्या विकास करण्याची संधी द्या, असं आवाहन त्यांनी केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.