नवी दिल्ली : 'दिलवाले' प्रदर्शित होण्याअगोदर एकमेकांचे गुणगाण गाणाऱ्या रोहीत शेट्टी आणि शाहरुख खान यांच्यात आता मात्र वाद झाल्याचं समोर येतंय.
चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यानं आता या अपयशाचं खापर कुणावर फोडणार? असा प्रश्न कदाचित दोघांनाही पडला असावा. त्यामुळे दोघांच्या मार्केटिंग टीमही एकमेकांना जबाबदार धरत आहेत.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, नुकतंच रोहित शेट्टीनं शाहरुखच्या मार्केटिंग, प्रमोशन आणि पीआर टीमवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. त्यानंतर मात्र शाहरुखच्या 'रेड चिली'ची टीम भडकली आणि हा सिनेमाच चांगला नव्हता असं स्पष्ट शब्दांत त्यांनी रोहितला सुनावलं. त्यामुळे रोहित चांगलाच भडकलाय.
'रेड चिली'नं चेन्नई एक्सप्रेस सिनेमासारखं दिलवालेचं जोरदार प्रमोशन केलं नाही, असा रोहितचा आक्षेप होता.
उल्लेखनीय म्हणजे, दिग्दर्शकाच्या रुपात रोहितच्या सिनेमांमध्ये 'रोहित अॅन्ड टीम' असा उल्लेख असतो. रोहितचा आपल्या टीमवर खूप भरवसा आहे. पण, यावादामुळे रोहित आणि शाहरुखची टीम आमने - सामने आलीय.
शाहरुख आणि काजोल अभिनीत 'दिलवाले' हा सिनेमा देशभरात २०० करोडोंचाही बिझनेस करू शकलेला नाही.