वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे असणाऱ्या एका शास्त्रज्ञांनी अमेरिकेतील एका प्रयोगशाळेत त्यांच्या साथीदारांसोबत असे मांस तयार केले आहे जे दीर्घकाळ टिकू शकेल. यामुळे पशूहत्येवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येण्याची आशा आहे.
पेशाने हृदयरोगतज्ज्ञ असलेले आणि 'मेम्फिस मीट्स'चे मालक असलेले शास्त्रज्ञ उमा एस वलेती यांनी केलेल्या दाव्यानुसार हे मांस 'क्रूरतारहित' आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार प्रयोगशाळेत तयार केल्या गेलेल्या या मांसावर जीवाणूंची वाढ होत नाही. तसेच या मांसाचा कोणताही विपरीत परिणाम शरीरावर होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हे मांस सुरक्षित, आरोग्यदायी आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. मुळचे आंध्र प्रदेशचे असलेल्या वलेती यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी प्राण्यांमधील काही पेशी घेऊन हे मांस विकसित केले आहे. या पेशी स्वतःच वाढत जातात आणि मांसाची निर्मिती होते.
या पेशींमध्ये त्यांनी ऑक्सिजन आणि शर्करा मिसळली. हे मिसळल्यावर नऊ ते एकवीस दिवसांच्या आत या मांसाची निर्मिती झाली. भविष्यात प्रयोगशाळेत अशाप्रकारचे मांस तयार करुन ते मोठ्या प्रमाणात व्यापारी तत्वावर विकल्यास पशूहत्येवर नियंत्रण मिळवता येईल, अशी त्यांना आशा आहे.