www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अत्यंत वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनविषयी तुम्ही ऐकलं असेल... ही ट्रेन ताशी तीनशे – साडे तीनशे किलोमीटर वेगाने धावते. पण, आता बुलेट ट्रेनपेक्षाही जास्त वेगाने प्रवासाची कल्पना पुढं आलीय. साध्या-सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, 'हायपरलूप'च्या साहाय्यानं आपण एका तासात मुंबईहून नागपूरला पोहचू शकतो.
मानवाला वेगाचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे आणि त्यातूनच ‘हायपरलूप’ची अनोखी कल्पना पुढं आली आहे. अमेरिकेतील एका गर्भश्रीमंत उद्योगपतीने ताशी ८०० किमी वेग असलेल्या ‘हायपरलूप’ या वेगवान प्रवासाची संकल्पना मांडली आहे. एलॉ़न मस्क असं त्याचं नाव असून त्यासाठी त्याने ५७ पानांच प्रेझेंटेशन तयार केलं आहे. तसेच त्याचे रेखाचित्र आणि एनिमेशनही तयार केलं आहे. मस्कच्या कल्पनेतील हा वेगवान प्रवास एलिव्हेटेड रेल्वेप्रमाणे उंचावर असणार आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची ट्यूब आणि त्यातून वेगाने धावणाऱ्या कॅप्सूलची व्यवस्था करण्यात येणार आहे. या कॅप्सूलमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी असन व्यवस्था असणार आहे. ही कॅप्सूल हवेवर तरंगत ताशी आठशे किमी वेगाने ट्यूबच्या पोकळीतून प्रवास करणार आहे. यातून तुम्हाला बुलेट ट्रेनपेक्षाही कितीतरी पट जास्त वेगाने प्रवास करता येणार आहे.
मस्कच्या म्हणण्यानुसार लॉस एन्जेलिस ते सन फ्रॅन्सिस्को हे चारशे मैलाचे अंतर केवळ तीस मिनिटांत पार करता येणार आहे. या वेगवान प्रवासाठी प्रवाशांना केवळ वीस डॉलर मोजावे लागणार आहेत. या प्रकल्पासाठी रेल्वे मार्गापेक्षाही कमी खर्च येणार असल्याचा एलॉन मस्कचा दावा आहे. मात्र, मस्कची ही कल्पना अद्याप कागदावरच आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.