नवी दिल्ली : भारताशी भूटानची असलेली मैत्री कायम ठेवत भूताननंदेखील पाकिस्तानला जोरदार झटका दिलाय.
पाकिस्तानातल्या इस्लामाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सार्क परिषदेत भूटाननंही सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केलाय. यापूर्वी भारतासहीत बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेनंही सार्क परिषदेवर बहिष्कार टाकलाय. पाच देशांच्या या निर्णयानंतर पाकिस्तानला नाईलाजानं का होईना पण हे संमेलन स्थगित करावं लागलंय.
सार्कचे सध्याचे अध्यक्ष नेपाल यांना संबोधित करताना भूटाननं सध्याच्या बिघडलेली परिस्थिती आणि अशांतीच्या वातावरणाबद्दल भारत, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानच्या चिंता योग्यच असल्याचं म्हटलंय. भारताच्या राष्ट्रीय हित जिथं असेल त्याला आमचं समर्थन असेल, असंही त्यांनी म्हटलंय.
भूटाननं याआधीही २००३ मध्ये उल्फा(ULFA), कामतापूर लिबरेशन ऑर्गनायजेशन (KLO) आणि नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड (NDFB) मधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावून भारताशी आपल्या मैत्रीचा दाखला दिला होता.