www.24taas.com, न्यूयॉर्क
आपल्या शरीरातील एक जटील अवयव... किडनी. किडनी खराब झाली तर मॅच होणारी दुसरी किडनी मिळेपर्यंत पेशंटला वाट पाहावी लागते. कधी कधी ती उपलब्धदेखील होत नाही. यामुळे डॉक्टरांच्या अडचणीत वाढच होते. परंतू, आता अशा पेशंटची आणि डॉक्टरांचीदेखील समस्या सुटण्याची शक्यता निर्माण झालीय. अमेरिकेल्या शास्त्रज्ञांनी चक्क प्रयोगशाळेतच किडनीचा जन्म घडवून आणलाय.
होय, हे सत्य आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेतच कृत्रिम किडनी तयार केलीय. प्रयोग म्हणून त्यांनी ही किडनी जनावरांमध्येही प्रत्यारोपण करून पाहिली आहे. या किडनीमध्ये लघवीही तयार होत असल्याचा दावा या शोधकर्त्यांनी केलाय.
शरीरातील इतर अवयव प्रयोगशाळेत याआधी तयार करण्यात आले होते. मात्र, किडनी या अवयवाची रचना जटिल असल्यामुळे कृत्रिम किडनी तयार करण्याचे प्रयत्न फोल ठरले होते. परंतू, अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी मात्र हा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. कृत्रिम किडनी रुग्णांना मॅच होणारी असल्यामुळे त्यांना आयुष्यभर औषध घेण्याची गरज उरणार नाही.
असं असलं तरी अजूनही हे संशोधन प्राथमिक पातळीवरच आहे. एखाद्याला किडनी बसवायची, ती मॅच होण्याची आवश्यकता असते. यामुळे मानवी शरीरात किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी अजून संशोधन, प्रयोग होण्याची आवश्यकता आहे. नेचर मेडिसन’ र्जनलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार कृत्रिमरीत्या तयार केलेली किडनी ही नैसर्गिक किडनीपेक्षा कमी कार्यक्षम असते.
अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनालयाने या प्रयोगाला अजून मान्यता दिलेली नाही. यानंतर हा प्रयोग जगभर होण्यासाठी याची परवानगी मिळणंही आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियेला आणखी तीन ते चार वर्षांचा वेळ लागू शकतो.