गायिका व्हिटने हाऊस्टनचे ४८ व्या वर्षी निधन

ख्यातानाम अमेरिकन गायिका व्हिटने हाऊस्टनचं वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झालं. व्हिटने हाऊस्टनच्या मृत्युचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

Updated: Feb 12, 2012, 10:40 AM IST

www.24taas.com, लॉस एंजेलिस
ख्यातानाम अमेरिकन गायिका व्हिटने हाऊस्टनचं वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झालं. व्हिटने हाऊस्टनच्या मृत्युचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. हाऊस्टन मागच्या वर्षीच्या मे महिन्यात ड्रग्ज आणि मद्यपानाच्या आहारी गेल्याने त्यावरील उपचारासाठी पुर्नवसन केंद्रात दाखल झाली होती.

 

आजवर सर्वाधिक पुरस्कार मिळवणारी गायिका म्हणून व्हिटने हाऊस्टनचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. आजवरच्या कारकिर्दीत व्हिटने विक्रमी ४१५ पुरस्कारांवर आपली नाममुद्रा कोरली. जगातली बेस्ट सेलिंग म्युझिक आर्टिस्ट असा लौकिक व्हिटने मिळवला.

 

आतापर्यंत व्हिटनेच्या अल्बम्स आणि सिंगल्सच्या १७० दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. आय वान्ना डान्स विथ समबडी, हाऊ विल आय क्नो आणि आय विल ऑलवेज लव यु या गाण्यांनी तिने जगाला वेडं करुन सोडलं. व्हिटने हाऊस्टनने सहा वेळा ग्रॅमी ऍवार्ड पटकावलं होतं.

 

ऑगस्ट २००९ मध्ये सात वर्षानंतर तिचा आय लुक टू यु हा अल्बम रिलीज करण्यात आला. अल्बम रिलीज झाल्यानंतर पहिल्या सात दिवसात तीन लाख प्रतींची विक्रमी विक्री झाली होती. २००९ साली तिने कमबॅक केलं तरी ती परत ड्रग्ज घेऊ लागल्याच्या बातम्याही प्रसिध्द झाल्या होत्या..