नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा सरताज कुणाच्या शिरावर विराजमान होणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे. कारण पीडीपी ३० जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलाय. तर भाजपनं कधी नव्हे ते २५ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारलीय. मात्र त्रिशंकू विधानसभेमुळं कुणाचं सरकार बनणार, हे कोडं अजून सुटलेलं नाही.
जम्मू काश्मीर म्हणजे भारताचं नंदनवन. पण दहशतवादामुळं कायम धुमसत राहणारं. मात्र दहशतवादी आणि फुटीरवाद्यांच्या आव्हानाला भीक न लागता काश्मिरी जनतेनं विधानसभा निवडणुकीत भरभरून विक्रमी मतदान केलं.. तब्बल २५ वर्षानंतर ६५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागला. मात्र कुणाही एका पक्षाच्या पारड्यात काश्मिरी जनतेनं स्पष्ट बहुमताचा कौल दिला नाही.
यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचा पार धुव्वा उडाला. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपीनं सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली. तर मोदी लाटेमुळे भाजपनं कधी नव्हे त्या २५ जागा जिंकून दुस-या स्थानी मुसंडी मारली. मात्र सरकार पीडीपीचं बनणार की, भाजपचं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भाजपसाठी सर्व पर्याय खुले असल्याचा दावा अमित शाहांनी केलाय.
या निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सला जबर फटका बसलाय. मावळते मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना सोनावर मतदारसंघात पराभूत व्हावं लागलं. मात्र बिरवाह मतदारसंघातून निसटता विजय मिळाल्यानं त्यांचं नाक वाचलं. अब्दुल्ला पितापुत्रांची काश्मीरवरील पकड ढिली पडल्याचं स्पष्ट झालंय.
काँग्रेसचीही काश्मीरमध्ये अक्षरशः धूळधाण झाली. आता सरकार स्थापन करण्यासाठी पीडीपीला पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेसनं दाखवलीय. धर्मनिरपेक्ष शक्तींना सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केलाय.
आता काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार बनवायचं, की भाजप आणि सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्सच्या पाठिंब्यानं सरकार बनवायचं, याचा निर्णय पीडीपीला घ्यावा लागणार आहे. सरकार बनवण्याच्या या प्रक्रियेत सज्जाद लोन यांची भूमिका महत्त्वाची ठरणाराय. कधीकाळी फुटीरवादी नेते अशी ओळख असलेल्या सज्जाद लोन यांच्या पक्षाला २ जागा मिळाल्यात. हंडवारामधून ते स्वतः विजयी झालेत. भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा लोन यांनी याआधीच केलीय. अशा परिस्थितीत पीपल्स कॉन्फरन्स आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या पाठिंब्यानं भाजपचं सरकार सत्तेवर येऊ शकतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धडाकेबाज प्रचारामुळंच भाजपला निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालंय. मात्र काश्मीर खो-यात मुसंडी मारण्यात अपयश आणि हिना भट यांचा पराभव, यामुळं भाजपच्या विजयाला गालबोट लागलंय. तरीही सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि पीडीपीमध्येच काँटे की टक्कर रंगणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.