www.24taas.com, नवी दिल्ली
‘डीएमके’चा यूपीएशी अखेर काडीमोड झालाय. डीएमकेच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना भेटून आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे सोपवलेत तर आणखी दोन मंत्रीही लवकरच राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.
डीएमके नेत्यांनी टी. आर. बालू यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामे सोपवलेत. द्रमुकच्या एस. गांधीसेल्वन, एस. जगतरक्षकम आणि एस.पलनिमणिक्कम या तीन मंत्र्यांनी बुधवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे राजीनामे सादर केलेत. तर एम. के. अलागिरी आणि डी. नागपोल्ली हे दोन मंत्रीही स्वतंत्रपणे आपले राजीनामे देणार असल्याचे द्रमुकचे नेते टी. आर. बालू यांनी सांगितले.
श्रीलंकेतील तमिळ मुद्यावर जयललितांवर कुरघोडी, जयललितांकडे झुकलेली बहुजन मते खेचण्याचा प्रयत्न, कनिमोळी प्रकरणाचा वचपा काढण्याचा डाव अशी अनेक कारणं डीएमकेच्या नाखुशीमागं आहेत.
दरम्यान, संयुक्त पुरोगामी आघाडीनं आता नव्या मित्रांचा शोध सुरु केला असून नव्या मित्रांसाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचे संकेत अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दिलेत. १८ मार्चला सकारात्मक चर्चा सुरु असताना डीएमकेनं १९ मार्चला म्हणजे मंगळवारी अचानक भूमिकेत बदल कसा केला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संसदेत श्रीलंकेविरोधात प्रस्ताव आणण्याची सरकारनं तयारी केली असताना डीएमकेनं पाठिंबा काढून घेण्यासाठी एवढी घाई कशाला केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. युपीए सरकार स्थिर असून पूर्ण बहुमत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला नसल्याची बाबही नमूद केली. श्रीलंकेतील तमिळ नागरिकांच्या मुद्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यावर यूपीएचे घटकपक्ष आणि विरोधी पक्षांमध्येही एकमत नाही. त्यामुळे प्रस्ताव आणण्यात आणि मंजूर करुन घेण्यात अडचणी असल्याचं चिदंबरम यांनी स्पष्ट केलं.