नवी दिल्ली : 'लज्जा' या त्यांच्या कादंबरीमुळे बांग्लादेशातून हद्दपार केल्या गेलेल्या आणि भारतात आश्रय घेणाऱ्या प्रसिद्ध बांग्लादेशी स्त्रीवादी नेत्या आणि लेखिका तस्लिमा नसरीन यांनी पुन्हा एकदा बांग्लादेशवर टीका केली आहे.
तस्लिमा यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की 'बांग्लादेशी लोकांनी पाकिस्तानला पाठिंबा देणे म्हणजे एका बलात्कारपीडित महिलेने तिच्या बलात्काऱ्याला पाठिंबा देण्यासारखे आहे.
Bangladesh supporting Pakistan is like a rape victim supporting her rapist.
— taslima nasreen (@taslimanasreen) February 27, 2016
कालच्या आशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या वेळी तस्लिमा यांनी हे ट्वीट केले होते. कालच्या सामन्यात अनेक बांग्लादेशी क्रिकेट प्रेमींनी भारताविरोधात पाकिस्तानला समर्थन केले होते.
बांग्लादेशातून हद्दपार केले गेलेले आणखा एक ब्लॉगर भौमिक चॅटर्जी यांनीही 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत या विधानाचे समर्थन केले आहे.
"१९७१ सालच्या बांग्लादेश मुक्ती युद्धासाठी पाकिस्तानने कधी साधी माफीही मागितली नाही. ही लज्जास्पद बाब आहे की बांग्लादेशातील लोक इतिहास विसरले आहेत तसेच ज्यांनी आमच्या आई - बहिणींवर अत्याचार केले त्यांना आमच्या देशातील लोक पाठिंबा देत आहेत," असे ते म्हणाले.
तस्लिमा यांच्या ट्वीटवर सोशल मीडियात बांग्लादेश आणि पाकिस्तानातून भरपूर टीका झाली. तस्लिमा या त्यांच्या वादग्रस्त आणि जहाल विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. १९९४ साली त्यांनी जीवाला असलेल्या धोक्यामुळे बांग्लादेश सोडला आणि गेली आठ वर्ष त्या नवी दिल्ली येथे वास्तव्यास आहेत.