गुजरात निवडणूक : मोदींना श्वेता भट्ट देणार टक्कर

गुजरातमधले निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 30, 2012, 01:32 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद
गुजरातमधले निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. नरेंद्र मोदींच्या मणिनगर विधानसभा मतदारसंघातून त्या काँग्रेसच्या तिकिटावर लढणार आहेत. आज श्वेता भट यांनी निवडणूक अर्ज दाखल केलाय.
गुजरात लोकशाहीच्या मार्गावरून दुरावलाय. लोकशाहीच्या संवर्धनासाठी मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणे ही पहिली पायरी असल्याचं श्वेता भट यांनी म्हटलंय. २००२ च्या गुजरात दंगलीला मोदीच जबाबदार असल्याचा गौप्यस्फोट संजीव भट यांनी केला होता. त्यानंतर त्यांना गुजरात सरकारनं निलंबित केलं होतं तर संजीव भट यांना उमेदवारी दिल्यामुळं काँग्रेसचा बुरखा फाटलाय. संजीव भट यांच्या माध्यमातून काँग्रेस गुजरातला बदनाम करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय. दरम्यान, मणिनगर मतदार संघातून तिकीट नाकारल्यानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नरहरी अमीन नाराज झाले आहेत. ते बंड पुकारण्याची शक्यता असल्यामुळं श्वेता भट यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.