www.24taas.com, नवी दिल्ली
विकिलिक्सनं केलेल्या खुलाशांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. त्यातच विकिलिक्सनं आता आणखी एक खुलासा केलाय. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांचा छोटा मुलगा संजय गांधी यांच्या हत्येचा एक नाही तर तीन वेळा प्रयत्न झाला होता, असं विकिलिक्सनं म्हटलंय.
यामध्ये एका हल्ल्यात उच्च क्षमतेच्या रायफलचाही प्रयोग करण्यात आला होता, असं या खुलाशामध्ये म्हटलंय. परंतू, हा हल्ला नेमका कुणी केले घडवून आणले होते किंवा हल्लेखोर कोण होते याचा मात्र कोणताही उल्लेख नाही.
सप्टेंबर १९७६ मध्ये अमेरिकेच्या दूतावासाला पाठवण्यात आलेल्या केबलनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी सुनियोजित पद्धतीनं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या छोट्या मुलावर म्हणजे संजय गांधींवर हल्ला केला होता. परंतू, हा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही. हल्ल्याच्या तारखेनुसार हा हल्ला आणीबाणीच्या काळात झाला असल्याचं स्पष्ट होतंय. ऑगस्ट ३० किंवा ३१ ला संजय गांधी यांच्यावर हल्लेखोरांनी तीन वेळा हल्ले केले होते. या हल्ल्यांतून संजय सुखरुप बचावले होते.
केबलनं भारतीय गुप्त सूत्रांच्या माहितीच्या आधारावर हे स्पष्ट केलंय. संजय गांधी यांच्या एकाधिकार शाहीच्या प्रतिमेमुळे त्यांनी अनेकांशी शत्रुत्व पत्करलं होतं.