मुरादाबाद : प्रत्येक क्षेत्रात चांगली वाईट माणसं असतात, वाईट माणसांमुळे त्या पेशाकडे वाईट तर, चांगल्या लोकांमुळे त्या क्षेत्राला प्रतिभा प्राप्त होते. पण पोलिस प्रशासनाकडून बहुतांश चांगला अनुभव मिळत नाही. कारण गुन्ह्याचे कलम लावण्याचे अधिकार असल्याने, त्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जातोय.
दिवसभर कारे-तुरे म्हणण्याच्या नादात, त्यातील अनेक जण माणूसपण विसरून जातात. ममतेची खोल वलंय क्रुरतेने भरून जातात, आणि आपोआप वागण्या-बोलण्यावर चढते ती गेंड्यांची कातडी.
उत्तर प्रदेशातील मुरादाबादाबादमधील ठाकुरद्वार पोलिसांनी असाच एक विक्रम केला आहे. त्यांच्या या अतुलनीय कार्यासाठी त्यांचा यथेच्छ सत्कार स्थानिक मीडियाकडून होतोय, त्यांची आता विभागीय चौकशी होणार असून, त्यांच्या हातात लवकरचं निलंबनाचं प्रमाणपत्रही पडणार आहे.
असा घडला प्रकार
मुरादाबाद विधानसभेच्या पोटनिवडणुकीत स्थानिक पोलिस स्टेशनने त्या भागातील लोकांची यादी प्रशासनाला पाठवली होती. शांती भंग करणे, मतदान केंद्रांवर ताबा मिळवणे आणि निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे, असे आरोप असलेल्या लोकांची ही यादी होती. यात एक आरोपी हा अवघ्या १ वर्षांचा होता. यात त्यांच्या २८ वर्षीय वडिलांच्या नावाचाही समावेश होता.
पोलिसांनी सीआरपीसी कलम 107 प्रमाणे ही नोटीस पाठवली होती. जेव्हा त्या एक वर्षाच्या मुलाचे वडील आपल्या मुलाला घेऊन जात मुचलक्याची रक्कम भरण्यासाठी कोर्टात आले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
विभागीय दंडाधिकाऱ्यांनी याची सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठांनी तीन पोलिस हवालदारांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. यात हे स्पष्ट झालं आहे की, घटनास्थळी न जाता, ही यादी बनवण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचं निलंबन आता निश्चित असून आज सायंकाळपर्यंत निलंबनाचे आदेश मिळण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.