नोयडा : उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये गोहत्या केल्याच्या आरोपावरून मोहम्मद अखलाकची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. अखलाकच्या कुटुंबातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुरजपूर न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत.
अखलाकच्या हत्येनंतर सापडलेलं मांस फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं. हे गोमांस असल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये समोर आलं. या रिपोर्टनंतर अखलाकच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीची याचिका दाखल करण्यात आली.
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं पोलिसांना हे आदेश दिले आहेत. अखलाकच्या कुटुंबियांनी केलेला गुन्हा गंभीर असल्याचं न्यायालयानं म्हंटलं आहे. दरम्यान या प्रकरणी आम्ही वरच्या न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया अखलाकच्या कुटुंबियांनी दिली आहे.