नवी दिल्ली : बुधवारी संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पानं सामान्या करदात्यांना दिलासा दिलाय. यानुसार जर तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाखांच्या आत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. पण, तुमचं उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त असलं तरी गुंतवणुकीद्वारे तुम्ही 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील करात सूट मिळवू शकाल.
- अर्थसंकल्प 2017-18 नुसार, तीन लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाही
- 80 C अंतर्गत तुम्ही 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक दाखवून सूट मिळवू शकता. यासाठी तुम्ही पब्लिक प्रोविडंट फंड, लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेमवर 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता.
- न्यू पेन्शन सिस्टम म्हणजेच एनपीएसमध्ये 50 हजार रुपये गुंतवून तुम्ही त्याद्वारे टॅक्समध्ये सूट मिळवू शकता
- जर तुम्ही गृह कर्ज घेतलं असेल तर गृह कर्जाच्या व्याजावर तुम्हाला 2.5 लाखांपर्यंत टॅक्स सूट मिळू शकेल.
अशाप्रकारे तुम्ही जवळपास 7.5 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर इन्कम टॅक्स वाचवू शकाल. याचा वापर पगारदार वर्ग आणि व्यावसायिक दोघांनाही होऊ शकतो.
अर्थसंकल्प 2017 नुसार, नियमांतील बदलाप्रमाणे करात 12,500 रुपयांची सूट सगळ्यांनाच मिळालीय. आयकराच्या पहिल्या स्लॅबमध्ये अर्थात 2.5 ते 5 लाख रुपयांच्या स्लॅबमध्ये बदल झाल्यानं हे शक्य झालंय.
या स्लॅबमध्ये आयकराचे दर 10 वरून 5 टक्क्यांवर करण्यात आलेत. त्यामुळे 3 ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर आता 25 हजारांऐवजी केवळ 12,500 रुपये कर भरावा लागणार आहे.