वरंगल : तेलंगणाच्या वरंगलमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती आली आहे. पोटच्या मुलानं वडिलांच्या अंत्यसंस्काराला नकार दिल्यानंतर मुस्लिम महिलेनं या हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले. याकूब बी असं या महिलेचं नाव आहे.
याकूब बी या वरंगलमध्ये वृद्धाश्रम चालवतात. त्यांच्या वृद्धाश्रमामध्ये श्रीनिवास नावाचे वृद्ध गृहस्थ राहत होते. श्रीनिवास यांना त्यांच्या घरच्यांनी सांभाळायला नकार दिल्यामुळे ते वृद्धाश्रमात आले. मंगळवारी त्यांचं निधन झालं. श्रीनिवास यांचा मुलगा शरथ अंत्यसंस्काराला हजर होता, पण त्यानं अंत्यसंस्कार करायला नकार दिल्यानंतर याकूब बींनी हे अंत्यसंस्कार केले.
कुटुंबानं दोन वर्षांपूर्वी श्रीनिवास यांना घराबाहेर काढलं होतं. एका बस स्टॉपवर लकवा लागलेल्या अवस्थेत श्रीनिवास सापडले. यानंतर ते याच वृद्धाश्रमात राहत होते. याकूब बी त्यांच्या नवऱ्याबरोबर हे वृद्धाश्रम चालवतात. या वृद्धाश्रमात 70 पेक्षा जास्त वृद्ध राहतात.