महेसाणा: पटेल आरक्षणाच्या मुद्द्यावरून जेलमध्ये असलेल्या आपल्या नेत्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चाला गुजरातमध्ये हिंसक वळण लागलं आहे. महेसाणामध्ये काढण्यात आलेल्या एका रॅलीमध्ये आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनीही लाठीमार आणि अश्रूधूर सोडले, यामुळे तणाव निर्माण झाला आहे.
पटेलांना ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीसाठी सरदार पटेल ग्रुपनं जेल भरो आंदोलनाचं आयोजन केलं होतं. यावेळी या ग्रुपचे प्रमुख लालजी पटेल यांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाली. यावेळी आपल्या डोक्याला दुखापत झाल्याचा दावा पटेल यांनी केला आहे. तर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक सुरु केल्यामुळे लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
दरम्यान या प्रकारानंतर सरदार पटेल ग्रुप आणि हार्दिक पटेलच्या संघटनेनं सोमवारी गुजरात बंदची हाक दिली आहे.