नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपनं स्वबळावर सत्ता स्थापन केली तर पंजाबमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता आली. मणीपूर आणि गोव्यामध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही आणि या दोन्ही राज्यांमध्येही भाजपचाच मुख्यमंत्री विराजमान झाला.
२०१४च्या लोकसभा निवडणुकांपासून काँग्रेसच्या पराभवाचा सुरु झालेला सिलसिला अजूनही कायम आहे. या पराभवांमुळे आता फक्त ६ राज्यांमध्ये काँग्रेसची स्वबळावर सत्ता आहे. तर बिहारमध्ये काँग्रेस जेडीयू आणि आरजेडीबरोबर तिसऱ्या क्रमांकाचा सहभागी पक्ष आहे.
हिमाचल प्रदेश, पंजाब, कर्नाटक, पुदुच्चेरी, मिझोराम, मेघालय या सहा राज्यांमध्ये काँग्रेसची स्वबळावर सत्ता आहे. यातल्या हिमाचल प्रदेशमध्ये याच वर्षाच्या शेवटी तर कर्नाटक, मिझोराममध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत. हिमाचल आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांमधूनही जर सत्ता गेली तर मात्र काँग्रेस फक्त छोट्या राज्यांपुरताच मर्यादित पक्ष राहिलं, त्यामुळे या निवडणुका म्हणजे काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई असंच म्हणावं लागेल.