नवी दिल्ली : यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी ऐवजी १ फेब्रुवारीला सादर करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय कॅबिनेची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातली तयारी अर्थमंत्रालयानं सुरू केलीय.
आज कॅबिनेट मंजुरी मिळाली तर अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटी मांडण्याची गेल्या कित्येक वर्षांची परंपरा संपुष्टात येईल. त्याचप्रमाणे आजच्या बैठकीत गेल्या ९२ वर्षांपासून स्वंतत्रपणे सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पालाही तिलांजली देण्याचा प्रस्तावही संमत होण्याची शक्यता आहे.
रेल्वे अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थसंकल्पाचाच भाग असेल. रेल्वेचा स्वंतत्र अर्थसंकल्प जरी सादर होणार नसला, तरी रेल्वेचा आर्थिक स्वातंत्र्यावर कुठलही गदा येणार नसल्याचं कॅबिनेट समोरच्या प्रस्तावात नमूद करण्यात आलंय.
अर्थसंकल्पची तारीख बदलल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनही लवकर सुरू करावं लागणार आहे. त्यासाठी हिवाळी अधिवेशनही आधीच सुरू करावं लागणार आहे. यासंदर्भात तारखांचे निर्णय कॅबिनेटची संसदीय कार्य समिती घेईल. तत्पूर्वी आजच्या कॅबिनेटमध्ये अर्थसंकल्पाबाबतचे सर्व प्रस्ताव मंजूर होणं गरजेचं आहे.