विधवांच्या आयुष्यात होळीचे रंग, अनिष्ट प्रथांना तिलांजली

वृंदावन : वृदांवन येथे सोमवारी एक अभूतपूर्व घटना घडली. 

Updated: Mar 22, 2016, 11:11 AM IST
विधवांच्या आयुष्यात होळीचे रंग, अनिष्ट प्रथांना तिलांजली title=

वृंदावन : वृदांवन येथे सोमवारी एक अभूतपूर्व घटना घडली. या शहरातील विधवा महिलांनी समाजाने घातलेल्या सर्व अनिष्ट प्रथा मोडून टाकल्या. गोपीनाथ मंदिराच्या आवारात त्या मनसोक्त होळी खेळल्या आणि होळीच्या रंगांत न्हाऊन निघाल्या.

हिंदू धर्मातील काही प्रथांनुसार विधवा महिला होळी खेळत नाहीत. देशभरातील हजारो विधवा महिला आपले आयुष्य घालवण्यासाठी वृंदावनमध्ये वास्तव्याला येतात. पांढऱ्या साड्या नेसून देवाचे नामस्मरण करणे हेच काय ते उद्दिष्ट त्यांच्या आयुष्यात राहिलेले असते.

पण, सोमवारी मात्र त्यांच्या याच आयुष्यात होळीचे रंग भरले गेले. सर्व प्रथा, परंपरा मोडून टाकत या महिला उत्साहात होळी खेळल्या. १०५ वर्ष वय असलेल्या कनक लता या सर्वाधिक वयाच्या महिला यात सामील झाल्या होत्या. अगदी व्हीलचेअरवर बसून त्यांनी होळीचा आनंद लुटला.

 

'हिंदू समाजात असलेली विधवांनी होळी न खेळण्याची अनिष्ट प्रथा आम्ही याद्वारे मोडण्याचा प्रयत्न केला. हा आमचा लहानसा प्रयत्न या महिलांच्या आयुष्यात एक नवी दिशा आणेल अशी आम्हाला आशा आहे,' असे सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.