अंदमान : अंदमानात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळात महाराष्ट्रातले जवळपास ७८ नागरिक अडकून पडलेत.
अंदमानमध्ये गेल्या २४ तासापासून वादळ सुरू असल्याने देशभरातील चौदाशे पर्यटक अडकलेले आहेत. या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी नेव्हीच्या सहा बोटी पोर्ट ब्लेअरवरून पाठवण्यात आल्यात. तीन आयएएफ चॉपर्सही पाठवण्यात आलीयत.
पोर्ट ब्लेअरपासून ४० कि. मी अंतरावर नील आणि हॅवलॉक बेटांवर हे पर्यटक अडकलेत. यामध्ये पुण्याचे ५५ ते ६०, ठाण्याचे १६ आणि नाशिकचे २ पर्यटक अडकल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. हवामान चांगले राहिल्यास पुण्याचे ३० पर्यटक परतण्याची शक्यता आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडे या तक्रारी आल्या आहेत. महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायातल्या दोन महत्वाच्या कंपन्या केसरी आणि वीणा वर्ल्ड यांचे मिळून एकूण ७० हून अधिक लोक अंदमानमध्ये अडकले आहेत.