बंगळुर: कर्नाटकमध्ये 12वीचा रसायनशास्त्राचा पेपर दुसऱ्यांदा फु़टला आहे. यामुळे विद्यार्थी चांगलचे भडकले आहेत. आता आम्ही परीक्षा देणार नाही, असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
कर्नाटक शिक्षण उच्च माध्यमिक विभागाच्या कार्यालयाबाहेर या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी आणि निदर्शनंही केली.
या विद्यार्थ्यांचा रसायनशास्त्राचा पेपर 22 मार्चला होणार होता, पण पहिल्यावेळी पेपर फु़टल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली, आणि 31 मार्चला हा पेपर पुन्हा ठेवण्यात आला.
पण दुसऱ्यावेळीही हा पेपर फुटला, यामुळे विद्यार्थी संतापले आहेत. परीक्षा न द्यायच्या विद्यार्थ्यांच्या इशाऱ्यामुळे बोर्डासमोर मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत.