www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अमेठीतील मतदान केंद्रामध्ये केलेली घुसखोरी आणि हिमाचल प्रदेशात १ मे रोजी केलेलं वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना चांगलंच भोवलंय. हिमाचल प्रदेशात केलेलं वक्तव्य भडकाऊ आणि आचारसंहिता भंग करणारं आहे असा ठपका ठेवत निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना समन्स बजावलंय. सोमवारी १२ मे रोजी चौकशीला हजर रहा अन्यथा पुढील कारवाई करू अशी तंबी निवडणूक आयोगानं दिली आहे.
अमेठीत मतदानाच्या दिवशी राहुल गांधी थेट मतदान कक्षापर्यंत पोहोचल्याची छायाचित्रं देशभरातील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. त्या पार्श्वाभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त संपत यांनी राहुल यांनी मतदान केंद्रात घुसखोरी केल्याची वस्तुस्थिती मान्य केली. परंतु त्यानंतरही त्यांच्यावरील कारवाईस विलंब झाल्याचा आरोप भाजपसह विरोधी पक्षांनी केला.
त्यानंतर आज निवडणूक आयोगाची प्रदीर्घ बैठक झाली आणि त्यात राहुल गांधी यांच्या घुसखोरी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही चौकशी उत्तर प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकार्यां च्या अधिपत्यातील वरिष्ठ करणार आहेत. त्याचा अहवाल सोमवारी अपेक्षित असून त्याच दिवशी राहुलवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशात सोलन इथं १ मे रोजी राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली होती. या सभेत त्यांनी भाजप सत्तेवर आल्यास २२ हजार लोक प्राणाला मुकतील असं वादग्रस्त विधान केलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.