www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
रिक्षा चालकांनाही बोनस मिळालाय. ऐकून आश्चर्य वाटलं ना. पण हे खरं आहे. बदलापुरातील २५६ रिक्षाचालकांना तब्बल चौदा लाख ८२ हजार रूपये संघटनेच्यावतीने बोनसरुपात देण्यात आले. त्यामुळे त्यांची दिवाळी जोरात आहे.
आपल्या रोजच्या मिळकतीतून काही पैसे बाजूला ठेवून ती रक्कम दिवाळीत बोनस म्हणून वापरण्याची योजना रिक्षाचालकांमध्ये भलतीच लोकप्रिय ठरली आहे. पहिल्या वर्षी १८ रिक्षाचालकांनी या योजनेत भाग घेतला. त्यांनी वर्षभरात २१ हजार रूपये जमा केले. वर्षांगणिक या योजनेचे फायदे लक्षात आल्याने सभासदांची संख्या वाढली आहे.
यंदा २५६ जणांना बोनस मिळाला. आपापल्या ऐपतीप्रमाणे दररोज संघटनेकडे ठराविक रक्कम जमा केली जाते वर्षअखेरीस बोनस म्हणून ती रक्कम दिली जाते. यंदा सुखदेव अहिरे या रिक्षाचालकाने अशाप्रकारे ४१ हजार ८०० रूपये तर सुभाष पाटील यांनी ३८ हजार ४०० रूपये बोनस मिळविला. जमा होणाऱ्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी प्रत्येकाला भेटवस्तूही देण्यात येते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.