Narayana Murthy on 70 Hour Work Week: नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन आठवडा 70 तासांचा असावा असं वक्तव्य केल्यानं इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी सर्वांचच लक्ष वेधलं होतं. ज्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा याच मुद्द्ला अनुसरून वक्तव्य केलं आहे. 70 तासांच्या कार्यालयीन आठवड्यासंदर्भातील वक्तव्यानंतर मूर्ती यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्याचसंदर्भात आता त्यांनी आपली बाजू मांडत कोणीही कोणाही व्यक्तीला दीर्घकाळ, तासन् तास काम करण्यासाठी सांगू शकत नाही किंबहुना गरजही नाही. पण, प्रत्येकानं ही बाब स्वत:हून समजून घ्यावी, विचार करावा असं ते म्हणाले.
आपण इन्फोसिसमध्ये 40 वर्षांहून अधिक काळासाठी जवळपास 70 तासांहून अधिक काम केल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्या वक्तव्याला अनुसरून अशा मुद्द्यांवर चर्चा करण्याव्यतिरिक्त स्वत:हून विचार किंवा आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं मूर्ती यांनी स्पष्ट केलं. 'मी सकाळी 6.30 वाजता नोकरीच्या ठिकाणी पोहोचत असे आणि तिथून रात्री 8.30 वाजता निघत असे. हे पूर्णपणे सत्य असून, मी खरंच असं केलंय. त्यामुळे हे पूर्णपणे चुकीचं आहे असं कोणीही म्हणू शकत नाही', असं ते म्हणाले. एका कार्यक्रमादरम्यानच्या व्याख्यानानंतर नोकरी आणि दैनंदिन आयुष्यातील संतुलन याविषयी वक्तव्य करताना आपण 40 वर्षे याच चक्रात असल्याची बाबही उपस्थितांपुढे ठेवली.
मूर्ती यांच्या वक्तव्यानुसार, तुम्हाला हे करायचंय (नोकरीचे तास) हे तुम्हाला कोणी सांगू शकत नाही या मुद्द्यावर ते ठाम दिसले. मूर्ती यांच्या मते एखाद्या गरीबाच्या भविष्यावर आपण जास्त काम केल्यानं किंवा काम न केल्यानं नेमका कसा परिणाम पडेल, याचा विचार करूनच अमुक एका व्यक्तीनं त्याच पद्धतीनं मेहनत घ्यावी.
इन्फोसिसच्या सहसंस्थापकांनी केलेल्या वक्तव्यातून एक वेगळा दृष्टीकोन त्यांनी सर्वांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. 'आपण जर जास्त मेहनत घेतली, जास्त चांगलं काम केलं, जास्त पैसे कमवले आणि जास्त कर दिला तरच त्या मुलाचं भविष्य उज्वल होऊ शकेल', असं ते म्हणाले. यादरम्यान त्यांनी जर्मन शास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचाही उल्लेख केला. एखादी चांगली व्यक्ती, जी मेहनती आहे, महत्त्वाकांक्षी आहे, त्या व्यक्तीची बुद्धी तल्लख आहे, शिस्तप्रिय आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाला प्रगतीच्या वाटेवर नेऊ शकतात हा विचार त्यांनी सर्वांपुढे ठेवला. यावेळी त्यांनी आणखी एका मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं. आज देशातील 60 टक्के भारतीय दर महिन्याला मोफत अन्नधान्यावर अवलंबून असल्याचं सांगत इतकं दारिद्र्य एखाद्या आर्थिक स्वरुपातील भक्कम देशाचा गुणविशेष नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.