www.24taas.com, पुणे
पुण्यामध्ये एक साधा ज्युनिअर क्लार्क थेट महापालिकेचा नगरसचिव बनला आहे. सरकारी कारभाराचा असा अजब नमुना पुणे महापालिकेतच अनुभवायला मिळू शकतो...
पुणे महापालिकेत काम करणारे बाबाजी आहेर यांचं सध्याचं पद आहे, जुनिअर क्लार्क... पण ते काम मात्र करतात उप-नगरसचिवाचं. कारण, त्यांच्याकडे या पदाची तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण तात्पुरती असलेली ही जबादारी ते तब्बल चार वर्षांपासून सांभाळत आहेत. उप-नगरसचिवपदाची तात्पुरती जबादारी असलली, तरी आहेर मात्र ब-याचदा असतात नगरसचिव. विद्यमान नगरसचिव सुनील पारखी रजेवर जाताना यांच्याकडेच पदभार देऊन जातात.
जुनिअर क्लार्क ते नगरसचिव बनण्याचा या महाशयांचा प्रवासही तेवढाच धक्कादायक आहे. हे महाशय आधी महापालिकेच्या पथ विभागातून नगरसचिव कार्यालयात आले. त्यानंतर पदोन्नतीच्या साऱ्या पाय-या टाळत त्यांनी तळाच्या पदावरून थेट वरच्या पदावर उडी घेतली. हे सर्व घडलं ते आहेर यांच्यावर स्थायी समितीच्या असलेल्या कृपेने.... विशेष म्हणजे हा सर्व प्रकार नियमबाह्य आहे. असा, अभिप्राय महापालिकेच्या विधी सल्लागार कार्यालयाने दिला असतानाही, सर्व नियम डावलून या महाशयांना आधी बदली आणि त्यानंतर मोठी बढती देण्यात आली. याबद्दल आम्ही महापालिकेकडे विचारणा केल्यावर उत्तर द्यायला टाळाटाळ करण्यात आली.
आहेर यांची नियुक्ती नियमबाह्य आहे हे तर स्पष्टच दिसतंय. मग, तरीही हेच महाशय या पदावर का हवेत? हे जाणून घेणंही तेव्हढंच महत्त्वाचं आहे. याचं कारण दडलंय नगरसचिव कार्यालयात... विकास कामांचा निधी कुस्ती स्पर्धेसाठी वळवण्याचा विषय असो, किंवा विकास आराखड्यावर पहाटेपर्यंत चाललेल्या चर्चेत उपसूचना दाखल करून त्यात पुन्हा फेरबदल करण्याचा विषय असो... अशी सर्व महत्त्वाची कामं होतात नगरसचिव कार्यालयाकडून... मग,अशी नियमबाह्य कामं करायला ऐकणारीच व्यक्ती हवी. आहेर राजकारण्यांची ही गरज पूर्ण करतात आणि त्याबदल्यात राजकारण्यांनी त्यांना नियमबाह्य पद बहाल करून अभय दिलंय.
या विषयाची आणखी एक दुसरी बाजूही आहे. एका व्यक्तीवर खिरापत उधळत असताना, दुसऱ्या कर्मचाऱ्यांवर कसा अन्याय केला जातोय. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आहेर यांचे नियमबाह्य नगरसचिव बनणे. आहेर यांच्या नियुक्तीमुळे १२ कर्मचाऱ्यांची पदोन्नती मात्र अडली आहे.
सगळे नियम धाब्यावर बसवून बाबाजी आहेर यांना उप-नगरसचिवपदावर बसवण्यात आलंय. याचा अर्थ महापालिकेकडे दुसरी पात्र व्यक्ती नव्हती, असा नव्हे तर, पात्र कर्मचाऱ्यांचा हक्क डावलून या महाशयांना पदावर बसवण्यात आलंय. सेवा ज्येष्ठतेनुसार नगरसचिव कार्यालयातल्या पाच व्यक्ती या पदासाठी पात्र आहेत. फक्त सेवा ज्येष्ठताच नाही तर या पदासाठी त्यांच्याकडे आवश्यक ती शैक्षणिक पात्रता आणि अनुभवही त्यांना आहे. तरीही या सगळ्यांचं प्रमोशन चार वर्षांपासून थांबवण्यात आलंय. त्यांची दाखल ना राजकारणी घेत आहेत ना महापालिका आयुक्त.
कोणीच दाद देत नसल्याने यातल्या काही कर्मचा-यांनी कोर्टाची पायरी चढली आहे. तर, काहींनी अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे दाद मागितली आहे. आयोगानेही योग्य व्यक्तींना पदोन्नती द्यावी अशा सूचना केल्या आहेत. मात्र, त्यालाही महापालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. उप-नगरसचिव पदावर पात्र व्यक्तीचे प्रमोशन थांबल्याने त्यांच्या पाठीमागे १२ लोकांचं प्रमोशन थांबलंय. हे सर्व घडलंय ते एकट्या बाबाजी आहेर यांच्या नियमबाह्य नियुक्तीमुळे...