www.24taas.com, मुंबई
आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स एकमेकांना भिडणार आहेत. पण, क्रिकेटरसिकांसहीत अनेकांचे डोळे मात्र दुसऱ्याच एका मुद्द्यावर लागलेत. तो म्हणजे, या मॅचसाठी शाहरुख वानखेडेवर जाणार का?
गेल्या आयपीएल सत्रात वानखेडेवर धिंगाणा घालणाऱ्या बॉलिवूड स्टार आणि केकेआर टीमचा मालक शाहरुख खानवर एमसीएनं वानखेडे स्टेडियमवर प्रवेश करण्यावर पाच वर्षांची बंदी घातलीय. या बंदीवर काँग्रेस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. दरम्यान, एमसीएनं तक्रार केल्यास शाहरूख खान विरोधात कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. एमसीए आणि शाहरुख खानचा वाद अजूनही संपलेला नाही. आज वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या मॅचसाठी शाहरूख येणार असल्याचं बोलंलं जातंय. यावेळी जर संघटनेनं शाहरुख विरोधात कारवाईची मागणी केली किंवा शाहरुख़ खानने कायदा हातात घेतला तर कोणाच्याही परवानगीची वाट न बघता त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय. मुंबई आणि केकेआर दरम्यानच्या मॅचसाठी शाहरुखने जर स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याला रोखण्यात यावं, असं पत्रच एमसीएने पोलिसांना दिल्यानं पोलिसही कर्तव्यपूर्तीसाठी दक्ष झालेत.
यामुळेच आता शाहरुख मन्नतमध्ये बसून मॅचचा आनंद लुटतो की अजून कुठे बसून आपल्या टीमला प्रोत्साहित करतो, याकडेच साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय.