www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ असं म्हणत ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर शॉन टेट मुंबईमध्ये स्थायिक होण्यासाठी सज्ज झालाय. मुंबईची माजी मॉडेल आणि सध्या एक बिझनेस वुमन म्हणून काम करणारी २० वर्षीय माशूमा सिंघा हिच्यासोबत शॉनचं सूत जुळलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉन-माशूमाची ओळख २०१०च्या आयपीएल सामन्यांदरम्यान झाली होती. दोन-तीन वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर शॉननं माशूमला पॅरिसमध्ये प्रपोज केलं. माशूमानंही त्याला होकार दिला. माशूमा सिंघानं एक स्विमसूट मॉडल म्हणून काम केलंय. तिच्या म्हणण्यानुसार, टेट मैदानावर जितका आक्रमक असतो तितकाच तो मैदानाबाहेर शांत असतो. माशूमासाठी टेटच्या मुंबई वार्याक वाढल्या असून, तीही आपल्या प्रियकरासाठी नेहमी ऑस्ट्रेलियात जाते. माशूमाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या टेटने आता भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतलाय.
शॉन टेटनं भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठीदेखील अर्ज केलाय. ‘भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर मला भारतीय टीमकडूनही खेळता येईल’ असं ट्विटदेखील शॉननं केलंय.
३० वर्षीय शॉन सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळतो. इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये टेटने नुकतीच हॅट्ट्रिकच केली. त्याचा हा पराक्रम पाहण्यासाठी माशूमाही जातीने हजर होती. ऑस्ट्रेलियाकडून शॉननं ३५ वनडे, ३ टेस्ट आणि १९ टी-ट्वेन्टी मॅच खेळल्यात. पुढच्या आयपीएलमध्ये त्यानं मुंबई टीमकडून खेळण्याचे प्रयत्नही सुरू केलेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.