www.24taas.com , झी मीडिया, औरंगाबाद
एकाच दिवशी १५० मर्सिडिज खरेदी करून औरंगाबादच्या उद्योजकांनी शहराला एक वेगळी ओळख दिली. मात्र शहरातील खराब रस्त्यांमुळं गाडीवर होणारा खर्च पाहता आता या सर्व गाड्या बंगल्यातील शोभेची वस्तू बनून राहिल्यात.
औरंगाबादच्या रस्त्यांच्या शोभा वाढवणाऱ्या १५० मर्सिडिज कार आता बंगल्याच्या बाहेर उभं राहून बंगल्याची शोभा वाढवतायेत. या मर्सिडिजनं जगात औरंगाबादची आगळीवेगळी ओळख निर्माण झाली होती. मात्र आता या मर्सिडिज फक्त घरांचीच शोभा वाढवताय. याचं कारण आहे औरंगाबादचे रस्ते. लाखमोलाची मर्सिडिज खरेदी करून ती खराब तर होणार नाही ना याची भिती आता मर्सिडिज मालकांना वाटतेय.
औरंगाबाद शहरात सध्या सगळीकडं खड्ड्यांचंच साम्राज्य आहे. या खड्ड्यांमुळं मर्सिडिजच्या सस्पेन्शनमध्ये बिघाड होतोय. शिवाय या गाड्या दुरुस्तीसाठी पुण्याला पाठवावी लागते. यासाठी लाखभर खर्च होतो. त्यामुळं आपली गाडी बुवा घरीच बरी असं, मर्सिडिज मालक म्हणतायेत.
गणरायाच्या आगमनापूर्वी खड्डेमुक्त रस्त्याची घोषणा हवेतच विरलीय. सध्याची परिस्थिती पाहता बाप्पांच्या विसर्जनानंतरही औरंगाबदकरांचे हाल कायम राहणार असंच दिसतंय. त्यामुळं या रस्त्यांवरुन कोणी एकेकाळी मर्सिडिजही धावायची या आठवणी सांगण्याची पाळी आता औरंगाबादकरांवर येऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.