इंग्लंडची निश्चयाची माती केली रे माती....

हाय वोल्टेज मॅचमध्ये इटलीनं पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडला ४-२ नं पराभूत करत युरो कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. या पराभवासह इंग्लिश टीमचं पुन्हा एकदा क्वार्टर फायनलमध्येच पॅकअप झालं.

Updated: Jun 25, 2012, 07:35 PM IST

www.24taas.com, वॉर्सा

 

हाय वोल्टेज मॅचमध्ये इटलीनं पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडला ४-२ नं पराभूत करत युरो कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. या पराभवासह इंग्लिश टीमचं पुन्हा एकदा क्वार्टर फायनलमध्येच पॅकअप झालं. ऍश्ली कोल आणि ऍश्ली यंग इंग्लंडच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले. सेमी फायनलमध्ये इटलीची गाठ बलाढ्य जर्मनीशी पडणार आहे.

 

युरो कप सुरु होण्यापूर्वी मॅच फिक्सिंगच्या आरोप असलेल्या इटलीच्या टीमनं युरो कपची सेमी फायनल गाठण्याची किमया साधली. फिक्सिंगसारख्या आरोपांमुळे कोणत्याही टीमचा आत्मविश्वास निश्चितच ढासळतो. मात्र. इटालियन टीमनं आपल्या खेळावर याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही. पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीनं बाजी मारत स्वत:ला सिद्ध केलं. तत्पूर्वी, मॅचच्या सुरुवातीपासूनचं इटलीनं मॅचवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. इंग्लंडच्या टीमला त्यांना फारशी संधीच दिली नाही. पहिल्या हाफमध्ये दोन्ही टीम्सना गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्या. सेकंड हाफमध्येही इटलीनं आक्रमक सुरुवात केली. मात्र, त्यांनाही गोल करण्यात अपयश आलं.

 

निर्धारित ९० मिनिटांत दोन्ही टीमला गोल करता न आल्यानं मॅच एक्स्ट्रा टाईमध्ये गेली. अतिरिक्त वेळेत इंग्लंडचा स्टार स्ट्रायकर वेन रूनीनं आपल्या टीमसाठी गोल्डन गोल करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र, त्याला अपयश आलं. इटलीनं गोल गोलपोस्टने धाडला मात्र तो ऑफसाईड ठरवण्यात आला. त्यानंतर मॅच पेनल्टी शूटआऊटमध्ये गेली. मारियो बालोटेलीनं इटलीला ध़डाक्यात सुरुवात करून दिली. इंग्लंडचा कॅप्टन स्टिव्हन जेराडनही बॉल गोलपोस्टने धाडला. त्यानंतर इटलीकडून एक चान्स मिस झाला. आणि इंग्लिश टीमच्या गोटात जोरदार सेलिब्रेशन झालं.

 

मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. ऍश्ली कोल आणि ऍश्ली यंगनं पेनल्टी मिस केली आणि तिथेच इटलीचा विजय निश्चित झाला. सबस्टिट्यूट म्हणून आलेल्या ऍलेसान्ड्रो डिमांतीनं गोल करत इटलीला विजय़ मिळवून दिला. आता सेमी फायनलमध्ये इटलीचा मुकाबला टुर्नामेंट फेव्हरिट असलेल्या जर्मनीशी होणार आहे.