www.24taas.com, अलिबाग
रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्रात तीन प्राध्यापकांचा बुडून मृत्यू झालाय. हे तिघंही पिंपरी चिंचवडच्या वायआयटी कॉलेजचे प्राध्यापक असल्याचं सांगण्यात येत आहे.
ते हरिहरेश्वरला सहलीसाठी आले होते. समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या या प्राध्यापकांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळं ते बुडाल्याचं सांगण्यात येतयं. कुशल सकाळे, निखिल काळे आणि श्वेता वटाणे अशी बुडालेल्या तिघांची नावं आहेत.
हे सर्व जण अभियांत्रिकी विभागात शिक्षण घेत होते. पर्यटनासाठी ते श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथे गेले होते. आज सकाळी पोहण्यासाठी तसेच फोटो काढण्यासाठी ते समुद्रात गेले होते. समुद्राला उघाण आल्यामुळे सुमारे सात ते आठ फूट उंचीच्या लाटा समुद्र किनाऱ्याला थडकत होत्या. या लाटांबरोबरच हे तरुण समुद्रात ओढले गेले.
मुसळधार पावसामुळे तसेच समुद्राला उधाण आल्याने शोध मोहिमेत अडथळे येत आहेत. त्यामुळे तूर्त ही मोहीम थांबविण्यात आली असून, सायंकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.