मुंबई : प्रवासासाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या लोकल सध्या महिलांसाठी असुरक्षित होत चालल्यात. चालत्या लोकलमध्ये गुरुवारी रात्री एक व्यक्ती महिलेला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकल प्रवास महिलांसाठी किती सुरक्षित हाच प्रश्न पुन्हा उपस्थित केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडलीये.
ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकलमधील दिव्यांगाच्या डब्यात एक व्यक्ती चढला आणि त्याने आधीपासूनच प्रवास करत असलेल्या महिलेशी गैरवर्तन कऱण्यास सुरुवात केली. संतापजनक म्हणजे त्या डब्यात इतर प्रवासीही होते मात्र एकही व्यक्ती तिच्या मदतीस धावून आला नाही. काहींनी व्हिडीओ बनवला मात्र एकहीजण मदतीला धावला नाही.
ठाण्याहून सीएसटीला जाणाऱ्या या लोकलमधील दिव्यांगाच्या डब्यात पहिल्यापासून काही लोक उपस्थित होताी. पीडित महिलाही या डब्यातून प्रवास करत होती. कुर्ला आणि दादरदरम्यान या डब्यात एख व्यक्ती चढली आणि त्याने महिलेशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेल्यानुसार व्यक्ती सीटवर बसलेल्या महिलेला मारहाण करण्याचा प्रयत्न करतोय. त्या व्यक्तीच्या एक हातात बाटली आहे. नशेत असलेल्या या व्यक्तीने बाटलीतील पदार्थ त्या महिलेच्या अंगावर उडवण्याचाही प्रयत्न केला.
महिलेला मारहाणा करणाऱ्या या व्यक्तीला दादरमध्ये अटक करण्यात आली. ही घटना घडली तेव्हा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचा जवानही तेथे होता. मात्र त्यानेही मदत केली नाही. त्याने याची माहिती रेल्वे कंट्रोल रुमला दिली. त्यानंतर लोकल दादरला पोहोचताच त्या व्यक्तीला अटक करण्यात आली.