मुंबई : एमएमआरडीएने कोरोना रुग्णांसाठी बांद्रयाच्या बीकेसी मैदानात उभारलेल्या कोविड रुग्णालयात पहिल्याच पावसात पाणी साचलं आणि त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. तर चक्रीवादळानंतरही बीकेसीतील कोविड रुग्णालय खंबीर उभे आहे, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.
मुंबईत कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन वांद्र्यात बीकेसीच्या मैदानात १००८ खाटांचे कोविड सेंटर विक्रमी वेळेत उभं केलं. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर या सेंटरमध्ये असलेल्या १५० रुग्णांना मंगळवारी अन्य ठिकाणी हलविण्यात आले. बुधवारी वादळानंतर भाजप नेते किरीट सोमैया यांनी लगेचच या रुग्णालयात पाणी भरल्याचा आरोप केला. त्यानंतर गुरुवारी भेट देऊन या रुग्णालयाचे पहिल्याच पावसात नुकसान झाले आणि पाणी भरले असा आरोप केला होता. याशिवाय सुरक्षेचं प्रमाणपत्र असल्याशिवाय या रुग्णालयात रुग्णांना ठेवू नका, अशी मागणीही सोमैया यांनी केली.
ठाकरे सरकारच्या बीकेसी येथील कोरोना रुग्णालयाला दुपारी 1 वाजता भेट दिली. फक्त पहिल्याच पावसात इथं जोरदार गळती झाली आहे. रुग्णालयाच्या आतील भागात पाणी आहे. आतापर्यंत फक्त निम्मेच बांधकाम झालेले दिसते. कोरोना पेशंटला इथे ठेवणे धोक्याचे आहे. मुख्य सचिवांना चौकशीची विनंती केली आहे. pic.twitter.com/Jc102mge88
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 4, 2020
दुसरीकडे एमएमआरडीएने चक्रीवादळात रुग्णालय खंबीरपणे उभे राहिले, असं सांगून दुसऱ्या टप्प्यात या रुग्णालयाच्या बाजुलाच दुसरं रुग्णालय बांधण्याचं काम सुरु असल्याची माहिती दिली. चक्रीवादळाआधी रुग्णांना हलविणे हा सावधगिरीचा उपाय होता. या रुग्णालयात ८० ते १०० किमी वेगाचा वारा सहन करणारी यंत्रणा मजबूत आहे. मात्र निसर्ग चक्रीवादळाचा वेग त्यापेक्षा जास्त अपेक्षित असल्याने खबरदारी म्हणून रुग्णांना स्थलांतरित करण्यात आले होते, असे एमएमआरडीएच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मुंबई महापालिकेनेही बीकेसी रुग्णालयातील फोटो ट्वीट करून रुग्णालयाचं नुकसान झाल्याचा दावा चुकीचा असून या अफवा असल्याचं स्पष्ट केलं. गुरुवारी संध्याकाळपासून रुग्णालय सुरु होईल, असा दावाही महापालिकेने केला.
Rumours claiming that the Jumbo facility set up at BKC has been badly affected by #CycloneNisarga is false. There has only been a minor damage to the fence - the hospital structure is sound and it can be put to operation this evening .#NaToCorona#BMCNisargaUpdates pic.twitter.com/Vyrlhxa2Ta
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 4, 2020
एमएमआरडीएचे आयुक्त आर. राजीव म्हणाले की, चक्रीवादळाचा सामना करावा लागला असला तरी पावसाळ्यात ही सुविधा नक्कीच उपयोगी पडेल. या रुग्णालयात रुग्ण लवकरत परत येण्यास सुरुवात होईल.
या रुग्णालयात १००८ बेडची जागतिक स्तरीय सुविधा आहे. त्यातील ५०४ नॉन-ऑक्सिजन सुविधा असळवले बेड आहेत तर उर्वरित ५०४ बेडमध्ये २४० बाय ४० मीटर क्षेत्रामध्ये ऑक्सिजनची सुविधा आहे. या रुग्णालयाच्या शेजारी दुसऱ्या टप्प्यातील कोविड रुग्णालय बांधण्याचे कामही सुरू आहे.