मुंबई: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री नालासोपारा येथे वैभव राऊत याच्या घरावर छापा टाकून ८ बॉम्ब आणि स्फोटकांचे साहित्य ताब्यात घेतले. सुरुवातीला वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक असल्याचे सांगितले जात होते. मात्र, 'सनातन'चे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत हा आमचा कार्यकर्ता नसल्याचे स्पष्ट केले.
तो आमचा कार्यकर्ता नसला तरी तो एक चांगला व्यक्ती आहे. पोलिसांवर आणि गृहखात्यावर आमचा विश्वास नाही. गृहमंत्री जाणूनबुजून हे घडवत आहेत. आम्ही त्याला शक्य ती मदत करु, असे सनातनचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांनी म्हटले.
वैभव राऊत हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. तो चांगला माणूस आहे. त्याच्या घरात स्फोटकं सापडणं शक्य नाही. तो असलं काही करू शकत नाही, असा आम्हाला विश्वास आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. सनातन संस्थेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असेही पुनाळेकर यांनी सांगितले.
नालासोपारा येथील भांडारआळी परिसरात वैभव राऊत याच्या घरावर आणि दुकानावर एटीएसच्या पथकाने गुरुवारी रात्री उशीरा छापा घातला. यावेळी पोलिसांना आठ देशी बॉम्ब आणि स्फोटके तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळाले. पोलिसांनी वैभव राऊतला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.