देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या लोअर परळ इथल्या डीलाइल पुलाचं प्राथमिक टप्प्यातलं तोडकाम सोमवारपासून सुरु होणार आहे. मात्र या पुलाच्या खाली राहणाऱ्या सतरा कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे या पुला खाली वर्षानुवर्षं राहणारे रहिवासी सध्या चिंतेत आहेत.
धोकादायक असल्यामुळे महिन्याभरापूर्वी वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी डिलाईल पूल बंद करण्यात आला. रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या या पुलाला आता तीन महिन्यांच्या कालावधीत तोडण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलाखाली राहणारी १७ कुटुंबं धास्तावली आहेत.
हा पूल धोकादायक जाहीर झाल्यापासून इथले रहिवासी चिंतेत आहेत. कारण अनेकांच्या नोकऱ्या, मुलांची शाळा जवळच आहे. त्यातच आता पुलासोबत घर तुटणार असल्यानं, पर्यायी घराची व्यवस्था जवळच व्हावी अशी अपेक्षा या रहिवाश्यांची आहे. धोकादायक असल्यामुळे पूल बंद करण्यात आला. तसंच पुलावरुन माणसांचं येणं जाणंही बंद करण्यात आलं. मात्र याच पुलाखाली सतरा कुटुंबीय राहतच आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना होण्यापूर्वी या राहिवाश्यांचं पुनवर्सन होणं गरजेचं आहे.