कोरोना मृतदेहाच्या व्हायरल व्हिडिओबाबत हॉस्पिटलचे हे स्पष्टीकरण

मृतदेह ताब्यात देण्यात होणाऱ्या दिरंगाईबाबतही खुलासा

Updated: May 7, 2020, 05:25 PM IST
कोरोना मृतदेहाच्या व्हायरल व्हिडिओबाबत हॉस्पिटलचे हे स्पष्टीकरण

मुंबई :  सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयामध्ये एका वॉर्डमध्ये रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या ठिकाणीच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे काही मृतदेह ठेवण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी या प्रकारावर टीका केली होती. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयसीएमआरकडे तक्रार केली आहे. यावर अखेर महापालिकेने रुग्णालयाचे स्पष्टीकरण दिले आहे.

या व्हिडिओची चौकशी करून त्याची सत्यता तपासण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली असून २४ तासांत अहवाल मागवण्यात आला आहे. या चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असे रुग्णालयाने म्हटले आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत याबाबतची चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केला जाणार आहे.

सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोविड रुग्णाचा मृतदेह मृत्युनंतर ३० मिनिटांच्या आत मृताच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याविषयी निर्देश दिलेले आहेत. पण काही वेळा रुग्णाचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास उपलब्ध नसतात किंवा फोन केल्यास रुग्णालयात येण्यास टाळाटाळ करतात. अशा वेळी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागास कळवले जाते. प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून मृतदेह शवागरात पुढील कारवाईसाठी पाठवला जातो, असं सायन रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी खुलाशात म्हटले आहे.

अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून काळजी घेतली जाईल आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सक्त निर्देश देण्यात आल्याचे रुग्णालयाकडून केलेल्या खुलाशात म्हटले आहे.

 

सायन रुग्णालयातील कोविड रुग्णांच्या वॉर्डमध्ये मृतदेह रुग्णांजवळच पडून असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून टीका झाली होती. राजकीय नेत्यांनीही या व्हिडिओची दखल घेऊन सायन रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये गंभीर प्रकार घडत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर रुग्णालयाने चौकशी समिती नेमून या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.