मुंबई : मुंबईतल्या लालबाग इथे होणारं शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांचं व्याख्यान पुढे ढकलण्यात आलं आहे.
सध्याचं वातावरण पाहता शिवप्रतिष्ठाननं हा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवत, मुंबईत होणारं भिडे गुरुजींचं व्याख्यान पुढे ढकलण्यात आलं आहे. मात्र हे व्याख्यानं नंतर घेतलं जाईल असंही शिव प्रतिष्ठाननं स्पष्ट केलं आहे.
दोषी असेन,तर देहदंडाची शिक्षा द्या, पण दंगलीचं सत्य समोर आलचं पाहिजे अस आज संभाजी भिडेंनी म्हटलंय. अॅट्रोसिटीमुळे लोकशाहीचा खून होत असल्याचं सांगून भिडेंनी त्यांच्यावर लावण्यात आलेला चिथावणीचा आरोपही फेटाळून लावाला. भीमा कोरेगावमध्ये दंगल भडकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर आज संभाजी भिडेंनी मीडियासमोर प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया दिली.
यावेळी वढू-बुद्रुकमध्ये गेल्या तीन चार वर्षात फिरकलोच नाही असंही संभाजी भिडेंनी म्हटलंय. जे घडलं, ते महाराष्ट्राला कंलक लावणारं आहे,त्यामुळे दोषी कोण हे समोर आलचं पाहिजे असं यावेळी भिडे यांनी म्हटलंय.