रेमंड कंपनीचे मालक विजयपत सिंघानिया राहतायत भाड्याच्या घरात

देशातील सर्वात श्रीमंत परिवारांपैकी एक असलेल्या सिंघानिया परिवारातील वाद समोर आला आहे. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 10, 2017, 03:35 PM IST
रेमंड कंपनीचे मालक विजयपत सिंघानिया राहतायत भाड्याच्या घरात

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत परिवारांपैकी एक असलेल्या सिंघानिया परिवारातील वाद समोर आला आहे. 

हा वाद विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यात निर्माण झाला आहे. रेमंड लिमिटेडचे मालक विजयपत सिंघानिया यांनी आरोप केला आहे की, गौतमने रेमंड लिमिटेड कंपनीला आपली व्यक्तिगत संपत्ती असल्याप्रमाणे वागत आहे. गौतममुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भाड्याच्या घरात रहावे लागत आहे

रेमंड लिमिटेड कंपनीची सर्व सुत्र मुलगा गौतम सिंघानिया याच्याकडे सोपविल्यानंतर विजयपत हे एका भाड्याच्या घरात राहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयपत सिंघानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आपल्या ड्युप्लेक्स फ्लॅटचा ताबा मागितला होता. यानंतर बुधवारी विजयपत सिंघानिया यांच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले की विजयपत यांची आर्थिक परिस्थिती खुपच खराब झाली आहे.

कंपनीसोबत झालेल्या करारानुसार सिंघानिया, गौतम, वीनादेवी आणि मुलं अनंत आणि अक्षयपत सिंघानिया यांना एक-एक ड्युप्लेक्स मिळणार होता. अपार्टमेंटमध्ये आपल्या हिस्स्यासाठी वीनादेवी आणि अनंत या दोघांनी यापूर्वीच एक संयुक्त याचिका दाखल केली होती. तर अक्षयपतने मुंबई उच्च न्यायालयात एक वेगळी याचिका दाखल केली आहे. विजयपत सिंघानियांचे वकील दिनकर मेडन यांनी न्यायालयात सांगितले की, ७८ वर्षीय सिंघानिया यांनी आपली संपूर्ण संपत्ती आपला मुलाच्या नावावर केली आहे. मात्र, त्यांचा मुलगा त्यांच्याकडे लक्ष देत नाही.

१००० कोटींचे शेअर्सही दिले मुलाला

वकीलाने सांगितले की, सिंघानिया यांनी आपल्या कंपनीतील सर्वच्या सर्व शेअर्स मुलाला दिले. या शेअर्सची किंमत जवळपास १००० कोटी रुपये आहे. सिंघानिया यांची गाडी आणि ड्रायव्हरही काढून घेतला असल्याचा आरोप होत आहे.

१९६० मध्ये बनविलं होतं १४ मजल्यांच घर

१९६० मध्ये हे १४ मजल्यांच घर बनविण्यात आलं होतं. त्यानंतर बिल्डिंगचे ४ ड्यूप्लेक्स रेमंड कंपनीची सब्सिडरी पश्मीना होल्डिंग्सला देण्यात आले. २००७ मध्ये कंपनीने या बिल्डिंगला पून्हा बांधण्याचा निर्णय घेतला.