Mumbai News : पावसाची माघार, मध्ये वाढणारं तापमान आणि आता रात्रीसह पहाटेच्या वेळी तापमानात होणारी घट हे संपूर्ण चित्र पाहता हवामानातील या प्रत्येक बदलाचा कमीजास्त स्वरुपात मुंबईतील नागरिकांवर थेट परिणाम होताना दिसत आहे. शहरामध्ये प्रदूषणातही लक्षणीयरित्या वाढ झाल्यामुळं त्याचा परिणामही नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
मागील काही दिवसांचा आढावा घेतल्यास मुंबईत शासकीय दवाखान्यांपासून खासगी रुग्णालयांमध्येही व्हायरल तापाची रुग्णसंख्या मोठ्या फरकानं वाढली आहे. तापाची तीव्रता वाढून किमान सात ते आठ दिवस हे आजारपण मुक्कामी राहत असल्याचं डॉक्टरांचंही म्हणणं असल्यामुळं नागरिकांना आरोग्य जपण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
दैनंदिन जीवनामध्ये नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव यासह अंगदुखी, डोतेदुखी अशा समस्य़ा सतावू लागल्या आहेत. त्यामुळं आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून, नागरिकांना पुन्हा एकदा मास्क आणि स्कार्फचा वापर करून नाक, तोंड झाकण्याचा सल्ला दिला जाच आहे. शहरात धुळीचं वाढतं प्रमाण आरोग्याच्या समस्यांमध्ये भर टाकत असल्यामुळं मास्कचा वापर आता पुन्हा एकदा वाढल्यास यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. याव्यतिरिक्त नागरिकांना पाणी उकळून पिण्याचा सल्लाही दिला जात आहे.
ताप अधिक दिवस राहिल्यानं अनेकांमध्येच डेंगी, मलेरिया आणि इतर समस्याही डोकं वर काढताना दिसत आहेत. लहान मुलं आणि वृद्धांना या आजारपणाचा अधिक झोका असल्यामुळं आरोग्याची अधिक काळजी घेत उघड्यावरील अन्नपदार्थ न खाण्याचा सल्लाही आरोग्य यंत्रणा देत आहेत. आकडेवारीनुसार म्हणावं तर, मुंबई शहरात मागील काही दिवसांत रुग्णांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली असून, सर्दी, खोकला आणि तापाचं प्रमाण येत्या काही दिवसांत आणखी वाढून त्यानंतर हा आलेख शमेल असा अंदाज आहे.