मुंबई: काही दिवसांपूर्वी पावसामुळे हिंदमाता, परळ यासारखे परिसर पाण्याखाली गेले असताना मुंबईत पाणी साचलेच नाही, असा छातीठोक दावा करणारे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अखेर साक्षात्कार झाला आहे. महापौर महाडेश्वर यांनी शनिवारी पश्चिम उपनगरातील द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांना रस्त्यावर साचणारे पाणी आणि खड्ड्यांबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना त्यांनी म्हटले की, मी मुंबईत पाणी साचलेच नाही, असे कधीही म्हटले नव्हते. मात्र, रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकट्या पालिकेला जबाबदार धरता येणार नाही.
पश्चिम द्रुतगती मार्गासारख्या रस्त्यांच्या देखभालीचे काम एमएमआरडीसारख्या यंत्रणांकडे आहे. मात्र, मुंबईतील लोक प्रत्येक रस्त्याच्या दुर्दशेसाठी पालिकेलाच जबाबदार धरतात. हे चुकीचे आहे. त्यामुळे इतर यंत्रणांनीही रस्त्यांच्या देखभालीकडे लक्ष द्यावे. असे बोलून मला कोणावरही चिखलफेक करायची नाही, मी फक्त वस्तुस्थिती मांडत आहे. पालिकेची जबाबदारी असलेल्या रस्त्यावरील खड्डे दोन दिवसांत बुजवले जातील, असे महापौरांनी सांगितले.