मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. या लॉक डाउनमुळे सर्वत्र बंद असल्याने सर्वसामान्यांची जशी गैरसोय होतेय तशीच मुक्या प्रण्यांची देखील होतेय. काही भागात या मुक्या प्राण्यांसाठी स्वयंसेवी संस्था पुढे आल्याचे पाहायला मिळते. पण बऱ्याच ठिकाणी माणसांची रहदारी नसल्याने प्राणी आणि पक्षांची गैरसोय होताना दिसून येत आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात असणाऱ्या भटकी कुत्री आणि मांजरांच्या खाण्याची बिकट अवस्था होत होती. दळणवळण बंद असल्याने काही करताही येत नाही अशी परिस्थिती आहे.
एअरपोर्ट स्टाफने मुंबईच्या महापौर असणाऱ्या किशोरी पेडणेकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली मदतीच्या त्यांनी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळ इथे असणाऱ्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेना युनियनचे चिटणीस संजय कदम यांना तात्काळ मदत करण्यास सांगितले.
त्यामुळे आता मिलींद तावडे, सतीश पेडांबे या प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सकाळ, दुपार आणि संध्याकाळी इथल्या भटक्या कुत्रे मांजरे यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आज मुंबईत कोरोनाचे १०६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ६९६ वर गेली आहे. यातील पाच जणांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ४५ झाली आहे. तसेच ५९ रुग्ण बरे झाले आहेत.