मुंबई : 'मुंबई मराठी पत्रकार संघा'ने आपल्या पहिल्या-वहिल्या क्रीडा पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा केली आहे.
गेली ३८ वर्षे क्रीडा पत्रकारितेत भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी यांना पहिला 'महेश बोभाटे क्रीडा पत्रकारिता पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. तर, दैनिक पुढारीचे क्रीडा पत्रकार संदीप कदम यांची ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणारा 'युवा क्रीडा पत्रकार' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
येत्या ७ मार्च रोजी सायंकाळी ४.०० वाजता पत्रकार भवनात माजी कसोटीपटू फारूख इंजीनियर आणि दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते या क्रीडा पत्रकारांचा सत्कार केला जाईल.
दै. दिव्य मराठीत क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या विनायक दळवी यांनी गेली चार दशके निर्भीड पत्रकारिता करून मोठे योगदान दिले आहे. तसेच दळवी यानी लोकसत्ता आणि सकाळ या दैनिकांमध्ये ३२ वर्षे क्रीडा संपादक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱया महेश बोभाटे यांच्या स्मरणार्थ हा पहिलावहिला पुरस्कार दिला जाणार आहे. दळवी यांना क्रीडा पत्रकारितेतील लिखाण आणि वार्तांकनाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
त्याचप्रमाणे अनेक दिग्गज क्रीडा पत्रकारांना घडविणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मरणार्थ याच वर्षीपासून देशी खेळांवर वार्तांकन आणि लिखाण करणाऱ्या युवा पत्रकाराला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय 'मुंबई मराठी पत्रकार संघा'ने घेतला असल्याचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी आज जाहीर केले.
त्या पुरस्कारासाठी गेली चार वर्षे स्थानिक पातळीवर होणाऱ्या देशी खेळांचे वार्तांकन करून युवा खेळाडूंच्या कलागुणांना न्याय देणाऱ्या युवा क्रीडा पत्रकार संदीप कदम यांच्या दमदार पत्रकारितेची दखल मुंबई मराठी पत्रकार संघाने घेतली. गेली चार वर्षे पुढारी दैनिकात क्रीडा उप संपादक म्हणून कार्यरत असलेल्या संदीप कदम यांच्याकडे वृत्तवाहिनीत काम करण्याचाही अनुभव आहे. कदम यांना नुकताच मनोहर विचारे प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.