मुंबई: कोरोना व्हायरसच्या Coroanvirus वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होणार, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. मुंबईतील अनेक बड्या गणेश मंडळांनी यंदा गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामुळे अनेक गणेश मूर्तीकारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने यापूर्वी गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये काम सुरु करण्यास मंजुरी दिली होती. मात्र, कामगार आणि कच्च्या मालाच्या अभावामुळे घरगुती गणेशमूर्तीही पुरेशा प्रमाणात तयार करता येतील का, याविषयी गणेश मूर्तीकार साशंक आहेत.
'लालबागचा राजा' यंदा विराजमान होणार नाही
Govt asked us to make eco-friendly idols but hasn't been able to give time to make build them or permission to make mandap to build idols. They asked us to build it at home but our houses aren't big. There's shortage of raw material due to transportation issues: Sagar, idol maker https://t.co/vVU78bC4oU pic.twitter.com/YUKtxVq6oE
— ANI (@ANI) July 4, 2020
'एएनआय' वृत्तसंस्थेने यासंदर्भात मुंबईतील एका मूर्तीकाराशी संवाद साधला. यावेळी त्याने म्हटले की, गणेश चित्रशाळांमध्ये काम करणारे कामगार आपल्या गावी जाऊन बसले आहेत. मुंबईत यायला ते घाबरत आहेत. आम्ही दरवर्षी जवळपास १२०० गणेशमूर्ती घडवतो. मात्र, यंदा आम्हाला फक्त ७०० गणेशमूर्तीच घडवता येतील.
राज्य सरकारने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करा, असे सांगितले आहे. मात्र, मूर्ती तयार करण्यासाठी नेहमीप्रमाणे मंडप उभारण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. आपल्या घरीच गणेशमूर्ती तयार करा, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, आमची घरे तेवढी मोठी नाहीत. याशिवाय, वाहतुकीवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कच्च्या मालाचाही तुटवडा जाणवत असल्याची प्रतिक्रिया गणेश मूर्तीकार सागर यांनी दिली.