मुंबई: झुंडबळी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीही संबंध नसल्याचा दावा करणाऱ्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भूमिकेवर शिवसेनेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यात मोहन भागवत यांनी झुंडबळीच्या घटनांविषयी आपली भूमिका स्पष्ट केली होती. झुंडबळी ही भारताची परंपरा नसल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, यावेळी त्यांनी भारतामधून होणाऱ्या गोमांसाच्या निर्यातीविषयीही मार्गदर्शन केले असते, तर बरे झाले असते, असा टोला 'सामना'तील अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
झुंडबळी आणि आरएसएसचा काहीही संबंध नाही - मोहन भागवत
या अग्रलेखात म्हटले आहे की, गोमांस बाळगल्याच्या संशयावरून गरीबांचे झुंडबळी जातात. त्यावर कारवाईची भाषा होते, पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही. परिणामी गोहत्या, गोमांस बाळगणे आणि खाण्याचा संबंध भारताशी जोडला जात आहे. मात्र, त्याचवेळी आणखी एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. गोमांस निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो. हा सारा व्यापार लपूनछपून न होता अधिकृतपणे पार पडतो. सरकारमान्य कारखान्यात गोहत्या करून रासायनिक प्रक्रिया केली जाते. मोठमोठ्या कंटेनर्समध्ये भरून गोमांस सरकारी परवानगीने परदेशात पाठवले जाते. जगात गोमांस निर्यातीमध्ये आपल्या देशाचा पाचवा नंबर लागत असेल तर याचा अर्थ दररोज लाखो गोमातांची कत्तल होत असेल.
अर्थव्यवस्थेतील मंदीची चर्चा करून वातावरण नकारात्मक करू नका- भागवत
एकीकडे गोमांस बाळगल्याच्या संशयावरून देशात गरीबांचे झुंडबळी जातात. मात्र, अशाप्रकारे गोवंश मारला जात असताना त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. तेव्हा सरसंघचालकांकडून यावर मार्गदर्शनाची अपेक्षा होती, असे शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे आता भाजपकडून याला कशाप्रकारे प्रत्यत्तर देण्यात येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.