मुंबई : माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यातला वाद अजूनही मिटलेला नाही. बच्चू कडूंनी राणांना माफ केल्याची घोषणा काल केली असली तरी कोथळा काढण्याची भाषा केली. त्यामुळे रवी राणांनी कडूंना थेट घरात घुसून मारण्याची भाषा केलीय. बच्चू कडू जर दम देत असेल तर जशास तसं उत्तर देणार आणि घरात घुसून मारायलाही कमी करणार नसल्याचं खुलं आव्हानच राणांनी दिलंय. (mla bacchu kadu and ravi rana again dispute)
मी माझ्या बाजूने हा वाद मिटवला आहे. पण एक लक्षात ठेवा, मी उद्धव ठाकरेंचा दम खाल्लेला नाही. बच्चू कडू तर काहीच नाही. त्याला, तो जर दम देऊन बोलत असल तर मी जशास तसं उत्त देईन. ज्या स्तरावर उत्तर हवंय त्या स्तरावर उत्तर देईन. रवी राणा प्रेमाच्या भाषेत 10 वेळा झुकेल. पण कुणी दम देत असेल, तर त्याला घरात घुसून मारायचीही हिंमत आहे, अशा भाषेत रवी राणा यांनी कडूंना धमकी दिली.
दरम्यान रवी राणा यांच्या धमकीच्या वक्तव्यावर आमदार कडू यांनी झी 24 तासवर प्रतिक्रिया दिली. "मी कालच्या भाषणात कुणाचं नाव घेतलं नाही. राणांनी स्वत:वर ओढावून घेण्याची गरज नव्हती. मला शांतता हवी असते. माझ्याकडे बरीच कामं असतात. त्यांची इच्छा असेल मला मार द्याची, तर मी 5-6 तारखेला परतणार आहे. त्यांनी यावं आम्ही त्यांचं स्वागत करु. राणा तलवार घेऊन आले तर मी फुल घेऊन स्वागत करेन", असं कडूंनी स्पष्ट केलं.
कडूंनी गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप राणा यांनी केला होता. तसेच कडू 'तोडपाणी' करणारा आमदार आहे, असा गंभीर आरोपही राणांनी केला होता. या आरोपानंतर कडूंनी आक्रमक होत राणांना आव्हान दिलं होतं. "राणा एका बापाचा असेल तर त्याने पुरावा द्यावा. जर केलेला आरोप खरा ठरला तर त्याच्या घरी भांडी घासेन", अशा शब्दात कडूंनी राणांना आव्हान दिलं होतं.